ध्येयनिष्ठा आणि दायित्वबोध : स्वीकारलेल्या जबाबदारीतून घडणारा स्वयंसेवक!

ध्येयनिष्ठा आणि दायित्वबोध : स्वीकारलेल्या जबाबदारीतून घडणारा स्वयंसेवक!

ध्येयनिष्ठा आणि दायित्वबोध : स्वीकारलेल्या जबाबदारीतून घडणारा स्वयंसेवक!

©️🖌️ YD
शब्दातून राष्ट्रचिंतन मांडण्याचा एक प्रयत्न…

संघकार्य करताना आपण ध्येय, निष्ठा, जबाबदारी आणि समर्पण असे शब्द अनेकदा ऐकतो. पण हे शब्द आपल्या रोजच्या वागण्यात किती उतरतात, याचा विचार करण्याची संधी काही बौद्धिकांमधून मिळते. प्रांत प्रचारक अण्णा वाळिंबे यांच्या ध्येयनिष्ठेवरील बौद्धिकातून अशाच आत्मचिंतनाची प्रेरणा मिळाली. त्यासोबत नंतर संवाद सत्रात श्री. धनंजय जोशी ( महानगराचे कार्यकर्ते) यांनी दायित्वबोधाविषयी मांडलेला विचारही मनात राहिला. नियुक्ती ही केली जाते आणि दायित्व हे स्वीकारले जाते. या स्वीकाराबरोबरच जबाबदारीची जाणीव येते. आपण कोणत्या ध्येयासाठी काम करतो आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले काम किती मनापासून स्वीकारतो, हे प्रश्न एकमेकांशी जोडलेले आहेत.
संघाच्या दीर्घ प्रवासात अनेक अडचणी आणि अनिश्चितता आल्या. आज दिसणारे परिणाम पूर्वीच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर नव्हते. तरीही त्यांनी वेळ दिला, परिश्रम घेतले आणि माणसे जोडली. त्यामागे स्वतःवरचा, स्वीकारलेल्या कार्यावरचा आणि सहकार्यकर्त्यांवरचा विश्वास होता. पूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि पूर्वीच्या कार्यकर्त्यांच्या जीवनातून हा विश्वास प्रामाणिक व्यवहारातून कसा निर्माण होतो, हे समजते. आपण वेळ पाळतो का, दिलेला शब्द पूर्ण करतो का, दुसऱ्याची अडचण समजून घेतो का, यातून आपल्या विचारांची ओळख होते. माझ्या बोलण्यामुळे एखादा माणूस प्रभावित होईलही, पण माझ्या वागण्यामुळे तो या कार्याशी जोडला राहील का, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.

शाखेतील खेळ, प्रार्थना, नियमित भेटणे, संपर्क, बैठका आणि प्रशिक्षणवर्ग यांतून परिचय वाढतो, विश्वास निर्माण होतो आणि स्वभाव घडत जातो. नवीन स्वयंसेवकाला आपलेसे करणे, त्याच्या घरी संपर्क करणे, अडचणीच्या वेळी पाठीशी उभे राहणे, यातून आत्मीयता निर्माण होते. या प्रक्रियेचे परिणाम दिसण्यासाठी सातत्य आवश्यक असते. नामस्मरणासारखी साधना व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव टाकते, त्याप्रमाणे शाखेतील संस्कारही व्यवहारात उतरतात. आणीबाणीसारख्या प्रतिकूल काळात कार्यकर्त्यांनी जपलेली सामूहिकता आणि सकारात्मक वृत्ती या साधनेचे महत्त्व सांगतात. विश्वासातून प्रयत्न, प्रयत्नांतून अनुभव आणि अनुभवातून दृढ होणारी श्रद्धा, ही कार्यकर्त्याच्या घडणीची प्रक्रिया आहे. या श्रद्धेला ध्येयाची स्पष्ट जोड हवी. संघाच्या प्रतिज्ञेतील हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांच्या संरक्षणाचा संकल्प समजून घेऊन त्यातील मूल्ये जीवनात उतरवायची आहेत. संस्कृती म्हणजे तत्त्वज्ञानाचे दैनंदिन जीवनातील प्रकटीकरण, हा विचार इथे महत्त्वाचा ठरतो. समाजाविषयीची आपुलकी आणि राष्ट्रकल्याणाचा संकल्प आपल्या व्यवहारात दिसला पाहिजे. अण्णांनी पूजनीय श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाचा संदर्भ देत शाखेचे कार्यक्रम, स्वयंसेवकांचा स्वभाव आणि त्यांची गुणवत्ता यांकडे लक्ष देण्याचा आग्रह मांडला. कार्याचा विस्तार होताना माणूस घडविण्याची ही प्रक्रिया अधिक जाणीवपूर्वक जपावी लागेल.

धनंजय जोशी यांनी मांडलेला दायित्वबोधाचा विचार मनाला भिडतो. नियुक्ती ही केली जाते आणि दायित्व हे स्वीकारले जाते. नावाची घोषणा झाली की नियुक्ती होते. त्या कामाची जबाबदारी आपण मनाने स्वीकारतो तेव्हा दायित्वबोध सुरू होतो. या कामासाठी वेळ काढायचा, तयारी करायची, सहकाऱ्यांना जोडायचे आणि काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करायचा, ही जाणीव स्वतःमध्ये निर्माण व्हावी लागते. कोणाला संपर्क करायचा, कोणती तयारी राहिली आहे, कोणाला मदत हवी आहे, याकडे आपले लक्ष असावे. काम पूर्ण झाल्यावर काय चांगले झाले आणि काय सुधारायला हवे, हे प्रामाणिकपणे पाहावे. चूक झाली तर ती मान्य करावी. सहकाऱ्यांची क्षमता आणि परिस्थिती समजून त्यांना काम द्यावे, मार्गदर्शन करावे आणि त्यांच्या योगदानाचे श्रेय त्यांना द्यावे. अडचण असल्यास वेळीच सांगणे आणि मदत मागणे हाही जबाबदारपणाच आहे. कधी अपेक्षित दायित्व मिळत नाही किंवा आपली कल्पना स्वीकारली जात नाही. त्याची खंत वाटू शकते. पण त्यामुळे कामाचा उत्साह कमी होत असेल तर आपल्या निष्ठेचे केंद्र तपासायला हवे. माझ्या अपेक्षा आणि कार्याची आवश्यकता यांचा मेळ घालण्याची तयारी माझ्यात किती आहे? माझ्यावर काम सोपवल्यानंतर इतरांना निश्चिंत राहता येते का? दायित्वबोधाचे खरे उत्तर आपल्या वागण्यातून मिळते.

आण्णा म्हणाले की, ध्येयनिष्ठेची परीक्षा यशात आणि अपयशातही होते. कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला तर आनंद होतो, कमी प्रतिसाद मिळाला तर निराशा होते. दोन्ही अनुभवांतून शिकून पुढे काम करायचे असते. संपर्क कमी पडला का, नियोजन चुकले का, सहकाऱ्यांची अडचण समजली नाही का, हे तपासणे आवश्यक आहे. ध्येयावरील श्रद्धेसोबत कामात सुधारणा करण्याची तयारी हवी. अण्णांच्या बौद्धिकातून समोर आलेले ध्येयनिष्ठेचे तीन गुण लक्षात ठेवण्यासारखे आहेत. ती परिस्थितीने न ढळणारी, कृतीची उत्कट ओढ निर्माण करणारी आणि सतत जागृत असायला हवी. कार्यक्रमाच्या दिवसाचा उत्साह पुढच्या दिवसाच्या संपर्कात आणि तयारीत टिकला पाहिजे. प्रार्थनेतील संकल्प आपल्या वेळेच्या नियोजनात आणि निर्णयांत उतरला पाहिजे. या आठवड्यात स्वीकारलेल्या कामासाठी मी काय केले, कोणता सहकारी जोडला, कोणाची अडचण हलकी केली आणि स्वतःची कोणती उणीव सुधारली, हे स्वतःला विचारता आले पाहिजे. ध्येयनिष्ठा दिशा देते आणि दायित्वबोध त्या दिशेने रोज पाऊल टाकण्याची जबाबदारी जागी करतो.
अण्णांनी बौद्धिकाचा समारोप करताना पुन्हा अधोरेखित केलेल्या पूजनीय श्रीगुरुजींच्या वचनाचा संपूर्ण आशयही हाच आहे:
विविध क्षेत्रांतील कामांसाठी शाखा हा आवश्यक आधार आहे. जिथे शाखा व्यवस्थित चालते, तिथे हाती घेतलेले कार्य यशस्वी करण्याचे सामर्थ्य उभे राहते. म्हणून शाखेतील कार्यक्रम आणि आचारपद्धती यांसोबत स्वयंसेवकांचा व्यवहार, स्वभाव आणि गुणांचा विकास यांकडे लक्ष द्यावे. या सर्व गोष्टींचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी एकाग्रतेने प्रयत्न करावेत. असे केले तर प्रत्येक क्षेत्रात विजय मिळविता येईल. आपले कार्य जितके भक्कम होईल आणि आपण जितक्या एकदिलाने ते करू, तितका सर्वत्र विजय मिळविण्याचा विश्वास दृढ होईल.
या विश्वासाला आपल्या रोजच्या प्रामाणिक कामाची जोड देणे, हीच आपल्या ध्येयनिष्ठेची आणि दायित्वबोधाची खरी कसोटी आहे.

#प्रेरणा

Comments

Popular posts from this blog

विचारविश्वात आपले स्वागत!

राम आदर्श आहे, रावण ही टाळायची वृत्ती आहे!

दिवाळी मध्ये तीन नव्या कुटुंबांशी जोडूया आपुलकीचं नातं!